परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मानयोजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी मागणी परभणी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात आमदार पाटील यांनी नमूद केले की, परभणी जिल्हा समितीची स्थापना दि. 28 मार्च 2025 रोजी करण्यात आली होती. समितीची बैठक होऊनही मागील पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांची निवड यादी शासनस्तरावर प्रलंबित आहे. यामुळे साहित्यिक व कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे.
गौरी-गणपती व महालक्ष्मीसारखे प्रमुख सण पार पडून गेले तरीही कलावंतांना मानधनाचा लाभ मिळालेला नाही. आता आगामी दसरा व दिवाळी सारखे मोठे सण येऊ घातले असून या पार्श्वभूमीवर कलावंतांना मानधन मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्रींकडे मागणी केली की, “कलावंत हे समाजाचे मार्गदर्शक व संस्कृती संवर्धन करणारे असतात. शासनाच्या जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेतून त्यांना दिलासा मिळतो. त्यामुळे प्रलंबित असलेली लाभार्थ्यांची निवड यादी तात्काळ मंजूर करून योजनेतील लाभ तत्काळ उपलब्ध करून द्यावेत.”
या प्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत अरविंद देशमुख, संजय पांडे, शिवाजी सुकते, शिवाजी सुगंध, सुभाष पांचाळ, राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक साहित्यिक व कलावंतांनीही शासनाकडे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्री स्तरावर आदेश निघाल्यास अनेक जेष्ठ कलावंतांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis