परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानाच्या प्रमुख मार्गदर्शिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “नारी सशक्तीकरणासोबतच समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी रक्तदानासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. महिलांची व कुटुंबाची सर्वांगीण प्रगती झाली तर समाजही निरोगी होईल.”
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. गजानन जाधव, डॉ. अबूतला, डॉ. नितीन सितळे, डॉ. खतीब यांनी परिश्रम घेतले. तसेच समवल, दत्तात्रेय हाके, जोगदंड यांच्यासह बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी केले.
या उपक्रमाद्वारे मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदान ही श्रेष्ठ सेवा असल्याचे सांगून आयोजकांनी पुढेही असे उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, महापालिकेच्या या प्रयत्नामुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis