सोलापूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोेपचार रुग्णालयासाठी अत्याधुनिक प्रणालीची २२ कोटी रुपये किमतीची नवीन एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग) मशिन मंजूर झाली आहे. मानवी शरीराच्या आतील भागांतील तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी या मशिनचा वापर होतो. शक्तिशाली चुंबक, रेडिओ लहरी व संगणक वापरामुळे आजाराची स्थिती समजल्यावर त्याबाबतचे अचूक निदान होते. मशिन एक्स-रेचा वापर करीत नसल्याने ते सुरक्षित आहे. याचा फायदा हा शहर व जिल्ह्यातील गरीब रुग्णांना होणार आहे.येथील शासकीय रुग्णालयात शहर व जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, कलबुर्गी, बिदर, विजापूर व तेलंगणासह अन्य जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच, येथून विजापूर, पुणे, हैदराबाद, धुळे, गुलबर्गा यासह अन्य महामार्गावर जर मोठा अपघात घडल्यास अशा वेळी जखमींचे एसआरआय करावी लागते. अशा वेळी जखमींना एमआरआय करण्यासाठी बाहेर पाठवावे लागते. सध्या येथे असलेले मशिन हे व्यवस्थित चालत नाही. म्हणून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून नवीन मशिनची मागणी होती. त्यानुसार अत्याधुनिक प्रणालीची मशिन मंजूर झाली. यासाठी आर्थिक तरतूदही झाली आहे. मानवी शरीराचा एमआरआय करणे महागडा व खर्चीक असल्याने अनेक वेळेला गरीब रुग्ण ते करून घेत नाहीत. टाळतात. पर्यायाने रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही. म्हणून तो आजार बळावतो. मग. काहीवेळेला मृत्यूही ओढावू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड