छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच त्याचे नियमित देखभाल होणे आवश्यक असून औद्योगिक क्षेत्रात महिलांसह सर्व घटकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
आज ऑरिक सिटी येथील ऑरिक हॉल येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पार पडली. बैठक उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीस विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये एमआयटीएल चे एमडी मलिकनेर, एमआयडीसी जॉईंट सीईओ विजय राठोड, जीएसटी जॉईंट कमिशनर अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, उद्योग सहसंचालक स्वप्निल राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, एमआयडीसी मुख्य अभियंता बाळासाहेब झांजे व इतर विभागाचे अधिकारी यांनी उपस्थिती लावली.
सदर बैठकीस जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना मासिआ, सीएमआयए, लघुउद्योग भारती सीआयआय, वाळुज इंडस्ट्री असोसिएशन व इतर संघटनांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
उद्योगमंत्री सामंत यांनी निर्देश दिले की, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा जसे रस्ते ,पाणी, पाईपलाईन ,वीज पुरवठा सुरळीत चालू राहतील याबाबत नियमित उपाय योजना कराव्या.तसेच औद्योगिक क्षेत्रामधील महिलांची सुरक्षा वाढवण्याबाबत पोलिसांना सूचना केल्या. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण काढून तिथे सर्विस रोड उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis