अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय आयुक्त अमरावती तथा मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदार संघ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची यादी तयार करण्याकरिता जाहीर सूचना `परिशिष्ट ब` व `प्रथम अनुसूची` दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, जिल्हा परिषद कार्यालय, अकोला, महानगरपालिका कार्यालय, अकोला, जिल्हयातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद, नगर पंचायत कार्यालय येथे प्रसिध्द केली आहे.
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना दि.30 सप्टेंबर प्रसिद्ध करण्यात आली. मतदार नोंदणी अधिनियमानुसार वर्तमान पत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिध्दी दि.15 ऑक्टोबर रोजी होईल. वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनर्प्रसिध्दी दि.25 ऑक्टोबर रोजी होईल. नमूना-19 व्दारे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख *6* नोव्हेंबर आहे. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.20 नोव्हेंबर रोजी होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.25 नोव्हेंबर होईल.
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि.25 नोव्हेंबर ते दि. 10 डिसेंबर असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे यासाठी दि.25 डिसेंबर हा दिवस निश्चित आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
शिक्षक मतदार संघातील अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक ते पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करावेत व अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे