अकोला, 30 सप्टेंबर (हिं.स.)।नवरात्र उत्सव म्हणजे देवीच्या आराधनेचा, संस्कृतीचा आणि सकारात्मकतेचा सोहळा. हाच पवित्र मुहूर्त साधत अकोल्यात यंदा “आरोग्य धनसंपदा योजना” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ झाला आणि सलग सहा दिवस चाललेल्या या भव्य आरोग्य व दंत तपासणी शिबिरात तब्बल ५००० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळित झालेले असताना आणि रुग्णालयांत बेड मिळणे अवघड झालेले असताना, निलेश देव मित्र मंडळ यांनी समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत या उपक्रमाची सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि लहानपणापासून आरोग्यविषयक जागृती घडवणे, हे या योजनेमागचे प्रमुख ध्येय ठरले.
२२ सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत शहरातील नामांकित शाळांमध्ये दररोज शिबिरे आयोजित करण्यात आली.बाल शिवाजी प्राथमिक शाळा, विवेकानंद शाळा, भारत विद्यालय, महाराष्ट्र शाळा, हप्पी हवस, स्कूल ऑफ स्कॉलर, सम्मीत पब्लिक स्कूल, प्लॅटिनम जुबली आणि अंतरंग पब्लिक स्कूल येथे हजारो विद्यार्थी लाभार्थी ठरले.
या शिबिरांत दंत तपासणी, रक्तदाब, वजन-उंची मोजमाप, सर्वसाधारण आरोग्य तपासणीसोबतच योग्य आहार, स्वच्छतेच्या सवयी, पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, मानसिक आरोग्य संवर्धन आणि लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावण्यात आले.
दंतविशेषज्ञांनी तर योग्य ब्रशिंग पद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घडवून दाखवले.
इंडीयन डेन्टल असोसिएशन, शुक्ल बाल रुग्णालय आणि देशमुख मल्टिपर्पज हॉस्पिटल यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व आरोग्यसेवकांनी शाळाशाळांत जाऊन मुलांची तपासणी केली. डॉ. सुनील मरवळ, डॉ. अश्विन परिख, डॉ. निखिल पांडे, डॉ. शकुन सराफ, शांतनू नारखेडे आणि डॉ. मेटांगे यांच्या योगदानाने हा उपक्रम यशस्वी झाला.
मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.“मुलांच्या आरोग्याकडे शाळेतच लक्ष दिले जात असल्याने आम्हाला दिलासा मिळाला. अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये लहानपणापासून चांगल्या सवयी रुजतील,” असे अनेक पालकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे