अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। कानपूर (उत्तर प्रदेश) येथे “आय लव्ह मोहम्मद ” असे बॅनर लावल्याप्रकरणी युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ अकोला येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने नागरिक एकत्र जमले होते. एकमुखाने मागणी करण्यात आली की, दाखल गुन्हे तात्काळ मागे घेतले जावेत आणि संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
धरन्यात सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणणे होते की “आय लव्ह मोहम्मद ” म्हणणे किंवा लिहिणे अजिबात बेकायदेशीर नाही, तर ती धार्मिक भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मग असे गुन्हे दाखल करणे हा सरळ सरळ संविधानाचा भंग आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनाचे नेतृत्व मोहम्मद मुस्तुफा, आसिफ अहमद खान, जावेद पठाण आणि इरफान खान यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोहम्मद जानी कुरेशी, चांद खान, मोहम्मद मुझम्मिल, राज भाई, उजैर खान लोदी, इमरान खान, मोहम्मद हम्झा, मोहम्मद मुशर्रफ यांच्यासह शेकडों कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
या दरम्यान AIMIM तर्फे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व उत्तर प्रदेश उच्च न्यायालय यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली की कानपूरच्या युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे