अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील पारस या गावाने धार्मिक क्षेत्रात एक मोठी ओळख निर्माण केली आहे. पारस येथील गणेश लांडे यांनी आपल्या गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे हुबेहूब मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या दर्शनाला आल्यानंतर भाविकांना जणू तुळजापूर गाठल्याचा अनुभव येतो आहे.
राज्यात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. हा उत्सव नऊ रात्री देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. राज्यात देवीची साडे तीन शक्ती पीठे आहेत. त्यापैकी एक तुळजापूर येथील भवानी माता ही पूर्ण पीठ मानलं जातं. याच आई तुळजाभवानी ची प्रचिती सध्या अकोल्यातील पारस गावात येत आहे. भव्यदिव्य मंदिराची कलाकृती आणि तिरुपती येथून आणलेली आई तुळजाभवानीची मूर्ती सध्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. हुबेहूब तुळजाभवानी सारखं रूप असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. या देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना तुळजापूरच्या भवानी देवीची प्रचिती आल्याचं भाविकांचे म्हणणे आहे. तर तुळजापूरचे प्रतिरूप म्हणून ही देवी असल्याचं भाविक म्हणतात.
गणेश लांडे यांच्या आईची तुळजाभवानी मातेचा मंदिर उभारण्याची अनेक वर्षांची इच्छा होती त्यांची ही इच्छा त्यांचे पुत्र गणेश लांडे यांनी पूर्ण करत तुळजाभवानी मातेचा मंदिर उभारला. पारस येथील या भव्य मंदिराची उभारणी अत्यंत बारकाईने करण्यात आली असून तुळजापूर येथील मूळ मंदिराच्या आराखड्याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर शिल्पकला व वास्तुरचना करण्यात आली आहे. देवीची ही मूर्ती बालाजी हून आणण्यात आली आहे, मंदिराचा कळस , देवीचा मुकुट आणि मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला स्तंभ सोन्याचा आहे.मंदिरातील गर्भगृह, शिखर, नक्षीकाम आणि सभामंडप पाहताना भाविकांना खरी तुळजापूर यात्रा केल्याची अनुभूती मिळते.पारस गावात हे मंदिर उभारल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना आता दूरवरचा प्रवास न करता तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची संधी मिळते आहे.
मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरतीसोबत नित्य पूजाअर्चा केली जाते.नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा आणि विशेष धार्मिक उत्सवांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. यामुळे पारस गाव हळूहळू धार्मिक पर्यटन केंद्र म्हणूनही नावारूपाला येत आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीबद्दल अपार आनंद व्यक्त केला आहे. गावातच तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घडत असल्याने गावकऱ्यांना देखील खूप समाधान वाटते.पारस येथे उभारलेले हे तुळजाभवानीचे मंदिर अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाचे केंद्र बनले असून पुढील काळात येथे भाविकांचा ओघ वाढणार हे निश्चित आहे. आता या ठिकाणी राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना देवीला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.
आईच्या डोळ्यांत तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचे स्वप्न होतं…ती अपूर्ण इच्छा पुत्र गणेश लांडे यांनी पूर्णत्वास नेली आहे. आईच्या श्रद्धेला आकार देत मुलाने उभारलेलं हे मंदिर फक्त भक्तीचं नव्हे, तर आई–मुलाच्या नात्याच्या अतूट प्रेमाचं प्रतीक ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे