अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.) नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात पातूर शहरालगतच्या टेकडीवरील श्री रेणुकामातेचे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः गजबजून गेले आहे. मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, येथील वातावरणामुळे हा परिसर आता मिनी माहूर’ म्हणून ओळखला जात आहे. पंचक्रोशीसह संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी गडावर येत आहेत.
अकोला शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर हे प्राचीन मंदिर वसलेले आहे. गडावर जाण्यासाठी भाविकांना २४० पायऱ्या चढून जावे लागते. मात्र वृद्धांच्या सोयीसाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पायऱ्या चढताना मार्गात हनुमान आणि गणपती मंदिर तसेच स्वर्गीय दीनानाथ महाराज यांची समाधी आहे. गडावरील उत्कृष्ट स्वच्छता आणि शांतता यामुळे भाविकांना अलौकिक शांतीचा अनुभव मिळत आहे.
नवरात्र काळात देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षणीय आहे. दररोज सकाळी ६:३० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या आरतीला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. विशेषतः अकोला, वाशिम, बार्शीटाकळी, मालेगाव अशा दूरदूरच्या ठिकाणांहून भक्त खास करून सकाळच्या आरतीला आवर्जून हजेरी लावत आहेत. सरकारला सद्बुद्धी येऊन अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत मिळो असे देवीकडे साकडे घातले आहेत. पातूरचा हा गड सध्या भक्ती आणि उत्साहाच्या चैतन्याने न्हाऊन निघाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे