परभणी, 30 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, ढगफुटी व नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असताना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ढिसाळ व अन्यायकारक धोरणाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भजन आंदोलन छेडण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा पिककर्ज वाटप थांबविण्याचा ठराव घेतला होता. मात्र, काल झालेल्या आमसभेत केवळ संचालक मंडळाच्या मर्जीतील व्यक्तींनाच पिककर्ज दिले जावे, असे आदेश बँक व्यवस्थापनाला देण्यात आले. या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहणार असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी दोन महिन्यांपासून पिककर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना वारंवार “आज या, उद्या या” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी शेतकरी निराशा आणि आत्महत्येच्या दारात उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ कर्जवाटप सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष केशव आरमळ, उपजिल्हाध्यक्ष अनंतराव चव्हाण, तालुका अध्यक्ष करण बोबडे, युवा जिल्हाध्यक्ष शेख जाफर, तसेच कार्यकर्ते मधुकर साळव, मंचक सोळंके, भारत फुके, काॅ.लिबाजी कचरे, काॅ. बाळासाहेब आळणे आदींचा सहभाग होता.
शेतकऱ्यांना योग्य हंगामी पिककर्ज मिळाले नाही तर त्यांच्या जीवनावर गदा येणार आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांनी तातडीने बँकेस आदेश देऊन सर्व पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज वितरित व्हावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis