खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड, 30 सप्टेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आणि परिसरातील कॅन्सरच्या रुग्णांना नांदेड येथेच अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी नांदेड येथे अत्याधुनिक असे कॅन्सर हॉस्पिटल उभारावे अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती .
या मागणीला यश आले असून नांदेड येथे शंभर खाटांचे अद्यावत असे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे . या अनुषंगाने राज्याच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेडसह मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेडमध्ये कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि योग्य ते उपचार करून त्यांना जीवनदान देण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा कार्यरत नव्हती . त्यामुळे या भागातील असंख्य कॅन्सर रुग्णांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेता गोरगरीब जनतेला कॅन्सर सारख्या अत्यंत गंभीर आजारावर मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या अनुषंगाने खा. डॉ. अजित गोपछडे यांनी डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांना निवेदन दिले होते . या निवेदनात नांदेड येथे शंभर खाटांचे अद्यावत असे कॅन्सर रुग्णालय उभारावे अशी मागणी त्यांनी केली होती . या मागणीच्या अनुषंगाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नांदेड येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे कळवले होते. त्यानंतर खा. डॉ. गोपछडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन नांदेड येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून आता नांदेड येथे 100 खाटांचे आंतररुग्ण आणि 50 खाटाचे दैनंदिन उपचार विभाग असे 150 खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे . या ठिकाणी कॅन्सर वरील शस्त्रक्रिया , किमोथेरपी , रेडिएशन थेरेपी अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमुळे नांदेडसह मराठवाडा , तेलंगणा कर्नाटक सीमावर्ती भाग , विदर्भ या भागातील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. नांदेड येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी मंजुरी दिल्याबद्दल खा. डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी . नड्डा , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार , आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्याचेही आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis