मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। फ्रेंच कंपनी सिट्रॉएनच्या भारतातील प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कंपनीची सी3 एअरक्रॉस एसयूव्ही आता पाच-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी पहिली कार ठरली आहे. भारत एनकॅपच्या क्रॅश टेस्टमध्ये या कारने प्रभावी कामगिरी करत प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या सुरक्षेत उच्च गुण मिळवले. पाच-सीटर प्रकारात चाचणी झालेल्या या मिड-साईझ एसयूव्हीने स्थिर बॉडी शेलसह उत्तम रचना दाखवत सुरक्षिततेच्या उच्च मानकांवर स्वतःला सिद्ध केले.
प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरक्रॉसला ३२ पैकी २७.०५ गुण मिळाले. फ्रंटल ऑफसेट बॅरियर टेस्टमध्ये ११.०५ तर साइड मुव्हेबल बॅरियर टेस्टमध्ये तब्बल १६ गुण मिळाले. चाचणीत गाडीची स्ट्रक्चर आणि फूटवेल एरिया स्थिर असल्याचे निष्पन्न झाले. पुढील प्रवाशांच्या डोकं, मान, छाती आणि गुडघ्यांचे रक्षण ‘गुड/अॅडिक्वेट’ स्तरावर असल्याचे नोंदले गेले. याशिवाय साइड इम्पॅक्ट परफॉर्मन्समध्येही गाडीने उत्तम निकाल देत एकूणच पाच स्टार रेटिंग पटकावले.
बाल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरक्रॉसला ४९ पैकी ४० गुण मिळाले. यात डायनॅमिक स्कोअर २४, CRS इन्स्टॉलेशन १२ आणि व्हेईकल असेसमेंटमध्ये ४ गुण मिळाले आहेत. आयसोफिक्स अँकर्स आणि टॉप टेथर पॉइंट्ससह बसवलेल्या चाईल्ड सीट्सनी समोरासमोर आणि साइड इम्पॅक्ट चाचण्यांमध्ये चांगले संरक्षण दिले. लेबलिंग स्पष्ट असणे आणि बसवताना सुलभता मिळणे हेही अतिरिक्त गुण मिळवण्याचे कारण ठरले.
चाचणीसाठी वापरलेल्या व्हेरिएंटमध्ये सर्व सीट्ससाठी सीटबेल्ट रिमाइंडर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, साईड व कर्टन एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी अशी साधने उपलब्ध होती. तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉईंट सीटबेल्ट्स आणि ॲडजस्टेबल हेड रेस्ट्रेंट्सही देण्यात आले होते.भारत एनकॅपकडून मिळालेले हे फाईव्ह-स्टार रेटिंग ग्राहकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते कारण आता सुरक्षितता ही केवळ अतिरिक्त बाब न राहता खरेदीचा निर्णायक घटक ठरत आहे. सिट्रॉएनच्या या पहिल्याच यशामुळे एअरक्रॉस आता मध्यम श्रेणीतील एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक आकर्षक पर्याय ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule