नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) :- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी ्बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन समोपचार योजनेला सभासदांनी कडाडून विरोध दर्शवला. पावसामुळे शेतकरी संकटात सापडल्याने सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी, असा ठराव सभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सुरुवातीपासूनच सभासद आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय चर्चेत आल्यावर सभासदांनी तीव्र आक्षेप घेतला. नवीन समोपचार योजनेला मंजुरी देताना व्याजमाफीबाबतचा ठराव नोंदवला गेला नाही, असा आरोप सभासद कैलास बोरसे यांनी केला. त्यावरून गोंधळ उडाला. बोरसे यांनी मागील इतिवृत्त रद्द करून, व्याज माफ करून मुद्दलाचे समान हप्ते करण्यात यावे व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, असा ठराव मांडला. प्रकाश शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले. सभासद सुनील ढिकले यांनीही हाच मुद्दा उपस्थित करून, याआधीच्या दोन कर्जमाफी योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे व जिल्ह्यासाठी अतिरिक्त मदत मिळवून द्यावी, अशी विनंती प्रशासकांकडे केली. सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अनेकदा खटके उडाले. मात्र अखेरीस शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे हा ठराव मंजूर करण्यात आला. सभासद राजू देसले यांनी बँकेतील माजी व विद्यमान संचालकांवरील गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित करत जबाबदारीची मागणी केली. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV