छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)शेतकरी व कामगार आज थेट आपल्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्तालयात घुसले.मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह विविध मागण्या करत शेकडो शेतकरी, कामगार आज विभागीय आयुक्तालयात घुसले . सुरूवातीला या आंदोलकांनी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर हे सर्व आंदोलक अचानक आयुक्तालयात शिरले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण होती.
शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन, महाराष्ट्र अखिल भारतीय शेतमजूर यूनियन यांच्यावतीने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आयोजित करण्यात आली. काही वेळ निदर्शने केल्यानंतर हे शेतकरी आंदोलक अचानक आयुक्तालयात शिरले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई देणे आणि रोजगार गमावलेल्या शेतमजुरांना व ग्रामीण - शहरी कामगारांना प्रति कुटुंब 30 हजार रुपये मासिक श्रमनुकसान भरपाई देणे यांचा समावेश आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करावी, अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे, तलाव, वीज वितरणाचे रोहित्र व खांब यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम राबवावा याचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis