रत्नागिरी : डायबेटिक रेटिनोपथीवरील आयुर्वेदीय औषधासाठी डॉ. निखिल माळी यांनी मिळवला कॉपीराइट
रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील प्रसिद्ध आयुर्वेद नेत्रचिकित्सक डॉ. निखिल माळी यांनी आयुर्वेदिक संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी मधुमेहजन्य दृष्टिदोष (Diabetic Retinopathy) यावर आधारित आयुर्वेदीय औषधासाठी कॉ
डॉ निखिल माळी


रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील प्रसिद्ध आयुर्वेद नेत्रचिकित्सक डॉ. निखिल माळी यांनी आयुर्वेदिक संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी मधुमेहजन्य दृष्टिदोष (Diabetic Retinopathy) यावर आधारित आयुर्वेदीय औषधासाठी कॉपीराइट मिळविला आहे.

त्यांच्या या संशोधनामुळे आयुर्वेद नेत्रचिकित्सा क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून, मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या विकारांवरील आयुर्वेद उपचारांना अधिक वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.

डॉ. माळी यांच्या संशोधनानुसार हे आयुर्वेदीय औषध रेटिनामधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांची दुरुस्ती करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून पेशींचे पुनर्निर्माण घडवते आणि डोळ्यांतील जखमा भरून येण्यास मदत करते. यामुळे रेटिनावर होणारे नुकसान कमी होऊन रुग्णाची दृष्टी टिकवण्यास मदत होते.

डॉ. निखिल माळी सध्या एम. ई. एस. आयुर्वेद महाविद्यालयामधील नेत्र विभागात कार्यरत असून, त्यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये याच विषयावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या चिपळूण येथील आयुर्वेदीय नेत्र रुग्णालयात नियमित रुग्णसेवा सुरू असून पुणे आणि मुंबई येथेही ते विशेष व्हिजिटसाठी उपलब्ध असतात.

आपल्या संशोधनाबद्दल बोलताना डॉ. माळी म्हणाले, मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या विकारांमुळे अनेक रुग्णांना अंधत्वाचा धोका निर्माण होतो. आयुर्वेदिक औषधांद्वारे हे टाळता येईल, हे आमच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या औषधामुळे लाखो रुग्णांना नवजीवन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande