पुणे : डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात
पुणे, 30 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग पुणे व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष ल
पुणे : डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात


पुणे, 30 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग पुणे व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा प्रारंभ आज डुडूळगाव येथे महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या शुभहस्ते झाला.

याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, आदी वन विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, ‘वृक्ष म्हणजे मानवाचे खरे सोबती आहेत. देशी वृक्ष लागवड व संवर्धन करून भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी व निरोगी वातावरण मिळू शकते. येथील वसुंधरेला वाचविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. देशी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते मोठे करण्याचा संकल्प करावा.’दरम्यान, डुडूळगाव येथील मोहिमेमध्ये निसर्गाशी सुसंगत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, कडुनिंब, बहावा, पळस, उंबर, आवळा, साग, करवंद, शेवगा, जास्वंद, काटेसावर, बेल, अर्जुन, सिरिस, पांगारा, कांचन, हिजळ, पन्हाळ, खैर, शेवती, तामण, सोनचाफा, पारिजात, मोरिंगा, पांगळी, करवंद काटेरी, सावर, कडंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्ष स्थानिक हवामान व मातीला अनुरूप आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande