नांदेड, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मागील कांही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती खरडून गेली आहे. पीकांची संपूर्ण नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आपद्ग्रस्त गावांना भेटी देवून शेतकऱ्यांना शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस पडला. पीके वाया गेली. विशेषतः नांदेड तालुक्यातील वाहणाऱ्या आसना नदीच्या बाहेर पाणी पडले. त्यामुळे नदीकाठची जमीन खरडून गेली. अनेकांची घरे कोसळली. जनावरे दगावली.या सर्व बाबींमुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार रस्त्यावर आले. हवालदिल झालेल्या शेतकरी राजाला धीर देण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आज नांदेड तालुक्यातील नीळा, आलेगाव, एकदरा, भालकी, चिखली बु., पासदगाव, पुयनी आदी गावांना भेटी दिल्या. ही सर्व गावे आसना नदीच्या बॅकवॉटर क्षेत्रात येतात. त्यामुळे या ठिकाणचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.नांदेड तालुक्यात झालेल्या नुकसानी संदर्भात शासनाकडून अधिक मदत मिळावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. त्यासोबतच पीकविमा कंपन्यांच्या परतावा संदर्भात नाराजी व्यक्त करतांना यामध्ये मोठी सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आजच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपचे विधानसभा प्रभारी मिलींद देशमुख, भाजपाचे मंडळ अध्यक्ष बापूराव उर्फ बंडू पावडे, अमोल कदम, दत्ता कोकाटे, माजी पंचायत समिती सदस्य बंडू पावडे, माजी सभापती सुखदेव जाधव, , आबाजी पावडे, गजानन कदम, गुलाबराव पाटील, आदींची उपस्थिती होती.
–----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis