कोल्हापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ने ययावर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दूध दर फरकाच्या माध्यमातून मोठी आर्थिक भेट जाहीर केली आहे. संघाकडून १३६ कोटी ०३ लाख रुपयांचा अंतिम दूध दर फरक व इतर लाभ थेट दूध संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, ही रक्कम १ ऑक्टोबर २०२५ रोजी अदा केली जाणार आहे, अशी माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये गोकुळला पुरवठा झालेल्या दुधाच्या आधारावर म्हैस दुधाला प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे, तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे फरक मिळणार आहे. याशिवाय व्याज, डिबेंचर व डिव्हिडंड या स्वरूपातही शेतकऱ्यांच्या हाती लाभ पोहोचणार आहे. यामुळे जिल्हा व सीमाभागातील ८ हजार १२ दूध संस्था आणि सुमारे ५ लाख सभासद शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार आहे.
गोकुळने दूध उत्पादकांसाठी केवळ दरफरकच नव्हे तर पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, किसान विमा, वासरू संगोपन अशा विविध योजनांसाठी जवळपास ४२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. उच्च गुणवत्तेचे पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, काफ स्टार्टर आदी सुविधा अनुदानावर उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या गोकुळचे प्रतिदिन दूध संकलन १८.५९ लाख लिटर असून, सणासुदीच्या काळात एकाच दिवशी २३.६३ लाख लिटर विक्री करून विक्रमी कामगिरी केली आहे. या यशामागे दूध उत्पादकांचा विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना फरकाची रक्कम अदा करून त्यांचा आनंद द्विगुणित करावा.असे त्यांनी दूधसंस्थांना आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar