नवी दिल्ली , 30 सप्टेंबर (हिं.स.)।भारत इस्रायलच्या विकासामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अजार यांनी सांगितले.पुढे त्यांनी गाझामधील संघर्षविरामाच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
रुवेन अजार म्हणाले कि, “कालचा दिवस ऐतिहासिक होता. केवळ अमेरिका नव्हे, तर अनेक अरब देश, मुस्लिम देश आणि पंतप्रधान मोदी यांनीही संघर्षविरामाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.” पुढे त्यांनी असेही नमूद केले की, भारत आणि इस्रायल यांची दहशतवादाबाबतची भूमिका एकसमान आहे, आणि या संदर्भात भारत इस्रायलसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी म्हटले, “दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका आम्हाला प्रेरित करते. आम्ही दहशतवाद, कट्टरवादाच्या विरोधात आहोत आणि दहशतवाद नष्ट करून एक चांगले भविष्य घडवू इच्छितो. आम्ही लोकांच्या सक्षमीकरणासाठी आणि शांततेसाठी कटिबद्ध आहोत.”
इस्रायली राजदूत अजार यांनी सांगितले की, पुढील १० वर्षांत आम्ही विकासासाठी सुमारे २०० अब्ज डॉलर्सचे कंत्राटे जारी करू. भारत देखील या संधीचा लाभ घेऊ शकतो.त्यांनी स्पष्ट केले की, हमासचे निशस्त्रीकरण आणि बंधकांची मुक्तता यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र उभा आहे. अजार म्हणाले की, आम्ही हे निश्चित करू की हमास पुन्हा बळकट होऊ शकणार नाही. पुढे त्यांनी आशा व्यक्त केली की, हमास संघर्षविरामाच्या प्रस्तावाला स्वीकारेल आणि त्यानंतर इस्रायल आपले सैन्य तेथून मागे घेईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode