रायगड, 30 सप्टेंबर (हिं.स.)। “आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अन्याय करणाऱ्यांना माफी नाही!” अशा घोषणांनी आज अलिबाग शहर दणाणून गेले. अनुसूचित जमाती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरक्षणात होणाऱ्या घुसखोरीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चाची सुरुवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, हातात झेंडे, बॅनर घेऊन समाजबांधव एकत्रित चालू लागले. “जय भीम – जय आदिवासी!”, “आरक्षणावर डाका – चालणार नाही!” या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले
यावेळी मार्गदर्शन करताना माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी नेते दिलीप भोईर म्हणाले, “आदिवासी, कोळी, भोई, धनगर, ठाकूर, कातकरी समाज हा रायगड आणि कोकणचा मूळ निवासी आहे. बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण देऊन जीवनात आशेचा किरण दिला. मात्र आज काही समाज आरक्षणात घुसखोरी करून आमचा हक्क हिरावून घेत आहेत. हा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. जर शासनाने दखल घेतली नाही तर मंत्रालयावर भव्य मोर्चा नेऊ.”
मोर्चादरम्यान संघर्ष समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी रायगड जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष भगवान नाईक, आदिवासी कोळी विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, अलिबाग तालुका अध्यक्ष मुकेश नाईक, ठाकूर समाज अध्यक्ष धर्मा लोगे, तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मोर्चाच्या अखेरीस समाजनेत्यांनी ठाम भूमिका मांडत, “आमच्या आरक्षणावर डाका टाकण्याचा प्रयत्न थांबवा, नाहीतर संघर्ष अधिक तीव्र करू” असा इशारा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके