लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर, लातूर तालुका आदी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज तसेच कंपन अनुभवास येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आज जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नोंदविलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:१३ वाजता मुरुड अकोला येथे २.३ रिश्टर स्केल, २४ सप्टेंबर रोजी हासोरी परिसरात २.४ रिश्टर स्केल आणि २६ सप्टेंबर रोजी बोरवटी परिसरात २.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. तसेच बोरवटी, दगडवाडी-रांपूर, सालगरा (ता. लातूर), हासोरी, बदूर, उस्तुरी, कलांडी (ता. निलंगा), औसा शहर, शिरूर-अनंतपाळ, राणी आंनकुलगा, घुगीसगावी, कुंभारवाडी (ता. रेणापूर) येथे गूढ आवाज आणि सौम्य कंपनाची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने या घटनांचा सविस्तर अहवाल तयार करून राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीएस), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (जीएसआय) आणि नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय) यांना पाठविला आहे. तज्ज्ञांकडून वैज्ञानिक तपासणी आणि मार्गदर्शन मिळावे, तसेच आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी प्रशासनाने केली आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ नजीकच्या तहसीलदारांना कळवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis