नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : वडनेर परिसरातील दोन चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याला ठार करण्याची परवानगी नागपूर वनविभागाच्या मुख्य कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे त्या संबंधित कारवाई त्वरित सुरू करण्यात येणार आहे. वनविभागाचे संपूर्ण पथक वडनेर परिसरात बिबट्यांचा शोध घेत आहे एकूण १८० हून अधिक अधिकारी कर्मचारी व लष्कराचे जवान या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर व सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांचे पथक दिवस-रात्र या नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहेत. बिबट्याने मुलाला राहत्या घरातून वडिलांसमक्ष नेल्यामुळे भविष्यात अशा प्रकारे बिबट्या पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेला कारणीभूत असलेला बिबट्या सदर क्षेत्रामध्ये आढळून आला आहे. नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडून बिबट्या जेरबंद करणे, त्याला बेशुद्ध करून पकडणे अथवा दोन्ही शक्य नसल्यास त्याला ठार करण्याची परवानगी मिळावी, असे वनविभागाने नागपूरच्या मुख्य कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानुसार मुख्य कार्यालयाने नरभक्षक बिबट्या ठार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV