परभणी, 30 सप्टेंबर (हिं.स.)यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर मोठे संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच शहरातील झोपडपट्टीधारक व गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे निकष न लावता शेतमजूर आणि शहरी भागातील बाधित प्रत्येक घराला वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
आज जिल्हाध्यक्ष लखन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी लताताई एंगडे, सय्यद युनुस, अनिल शिंदे, बाळा राऊत, दिलीप बडवणे, सारिका भोसले, कांताबाई सावने, प्रशांत तुपसमुंद्रे, संदीप इंगळे, संजय कांबळे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
नेत्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी त्यांच्यावर अवलंबून असलेले शेतमजूर उपाशीपोटी राहत आहेत. दुसरीकडे शहरी भागात झोपडपट्टीधारकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे आरोग्य आणि उपजीविकेचे संकट वाढले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis