नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आवाहनानंतर व आ. सतेज पाटील यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांची मदत कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नांदेड येथे मंगळवार (ता.३०) रोजी दाखल झाली.
दरम्यान खा.रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पाच मिनी टेम्पोतील जीवनावश्यक वस्तूच्या किट हस्तांतरित करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मदतीचा हात म्हणून शक्य ती मदत मराठवाड्यातील जिल्ह्यातील पूरग्रस्तांना करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. दरम्यान आ. सतेज पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथील मदत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नांदेड येथे मंगळवार रोजी पोहचली. जिल्हा काँग्रेस कार्यालय नवा मोंढा येथे मदत हस्तांतरित करण्यात आली. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नांदेड काँग्रेसच्या माध्यमातून ही मदत पोहचविण्यात येणार आहे. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis