एक ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन
नाशिक, 30 सप्टेंबर, (हिं.स.) मानवी जीवनाचा प्रवास हा जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा असतो. या प्रवासात प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो, परंतु ‘ज्येष्ठ नागरिकांचा टप्पा’ हा अनुभवाचा, शहाणपणाचा आणि जीवनमूल्यांचा खरा खजिना घेऊन येतो. म्हणूनच दरवर्षी १
एक ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन


नाशिक, 30 सप्टेंबर, (हिं.स.) मानवी जीवनाचा प्रवास हा जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा असतो. या प्रवासात प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो, परंतु ‘ज्येष्ठ नागरिकांचा टप्पा’ हा अनुभवाचा, शहाणपणाचा आणि जीवनमूल्यांचा खरा खजिना घेऊन येतो. म्हणूनच दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा “आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन” हा केवळ एक दिन नसून आपल्याला स्मरण करून देणारा एक संस्कार आहे की, ज्येष्ठांचा सन्मान हा आपली संस्कृती, आपली मुळे आणि आपला वारसा जपण्याचा मार्ग आहे.

ज्येष्ठ म्हणजे अनुभवाचे विश्व - आजी-आजोबा किंवा आई-वडील हे घराचे आभूषण असतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे केवळ वयाची खूण नसते, तर त्या असतात आयुष्यभर केलेल्या परिश्रमांच्या, कुटुंबासाठी वाहिलेल्या श्रमांच्या आणि समाजासाठी घडवलेल्या कार्याच्या जिवंत आठवणी. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला मिळणारी शिकवण ही कोणत्याही मोठ्या ग्रंथापेक्षा मौल्यवान असते. त्यांच्या आशीर्वादातूनच पुढील पिढी सक्षम होते, रुजते, आणि वाढते.

बदलत्या काळातील आव्हाने - आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक जीवनशैलीत अनेकदा ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होते. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले तरी मनामनांतील अंतर वाढले आहे. मुलं-मुली परदेशी किंवा दूरवर नोकरी-व्यवसायासाठी गेल्यामुळे अनेक ज्येष्ठ मंडळी एकाकीपणाने जगत असतात. आरोग्याच्या समस्या, आर्थिक असुरक्षितता आणि भावनिक आधाराचा अभाव या सगळ्यांशी ते झुंज देत असतात. त्यांना हवी असते ती केवळ औषधोपचारांची सोय नव्हे, तर आपुलकीची मिठी, एखादं लक्षपूर्वक ऐकणारं कान आणि सन्मानाने जगण्याची संधी.

कुटुंब आणि समाजाची जबाबदारी - ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नाही, तर तो आपला संस्कार आहे.त्यांच्या अनुभवाचा आदर करणे,त्यांच्या मतांना महत्त्व देणे,त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना “आपलेपणाची जाणीव” करून देणे हाच खरा सन्मान आहे.

कुटुंबात ज्येष्ठ असणे म्हणजे घराला एक भक्कम पाया लाभणे होय. त्यांच्यामुळे घरातील नात्यांना एकत्र राहण्याची ताकद मिळते. समाजानेही वृद्धांसाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आपल्याला हे शिकवतो की “आज आपण आपल्या ज्येष्ठांचा आदर करू, उद्या पुढील पिढी आपला आदर करेल.” ही साखळी टिकवणे, जपणे आणि पुढे नेणे हेच या दिवसाचे खरे सार आहे.

म्हणूनच या दिवशी आपण ठरवूया कि, ज्येष्ठांना वेळ देऊ, त्यांचे अनुभव ऐकू, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू,आणि त्यांना वाटू देऊ की “आम्ही अजूनही या कुटुंबाचा, या समाजाचा अविभाज्य भाग आहोत.”

ज्येष्ठांचा सन्मान म्हणजेच आपल्या संस्कृतीचा सन्मान. त्यांच्या आशीर्वादाशिवाय समाजाला खरी समृद्धी मिळणार नाही. म्हणूनच चला, आजच्या दिवसापासून आपण ठरवूया “ज्येष्ठांचा आदर, हीच खरी भविष्याची वाट.”

विश्वानंद साळवे -

विपणन व माहिती अधिकारी ,

किम्स मानवता हॉस्पिटल , नाशिक

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande