परभणीत महिलेची पोलीस अधीक्षकांकडे कलम 307 लावण्याची मागणी
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - नवा मोंढा परिसरातील घराच्या वादातून झालेल्या हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीस न्याय मिळावा व हल्लेखोरांवर खुनाच्या प्रयत्नाचा (कलम 307) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित पत्नी कुंता रामराव कदम यांनी पोलीस अधी
परभणीत महिलेची पोलीस अधीक्षकांकडे कलम 307 लावण्याची मागणी


परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - नवा मोंढा परिसरातील घराच्या वादातून झालेल्या हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीस न्याय मिळावा व हल्लेखोरांवर खुनाच्या प्रयत्नाचा (कलम 307) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित पत्नी कुंता रामराव कदम यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुंता कदम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या सासऱ्याने वाटणीमध्ये दिलेल्या घरावरून सासरे दत्तराव कदम, सावत्र सासू येणुबाई, पुतण्या ऋषीकेश कदम व त्यांचे नातेवाईक सतत वाद निर्माण करीत होते.

दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता घरासमोर बसलेल्या कुटुंबावर अचानक हल्ला करण्यात आला. त्यावेळी गजानन अवचार, ऋषीकेश कदम, शिवराज खटींग आणि रमेशभाऊ यांनी त्यांच्या पती रामराव कदम यांना जबर मारहाण केली. भांडण सोडविण्यास गेलेल्या भाच्याच्या डोक्यावरही फर्शी मारून त्याला गंभीर दुखापत करण्यात आली. याचवेळी अर्जदार कुंता कदम यांच्यावर साडी फाडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तरीदेखील पोलिसांनी कलम 307 न लावल्याने न्याय मिळत नसल्याची खंत पीडित महिलेने व्यक्त केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, “सदर प्रकरणाचा तपास एकतर्फी होत असल्याने आरोपी अधिक बळकट होत असून भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर कलम 307 दाखल करून कठोर कारवाई करावी.” कुंता कदम यांनी आपल्या निवेदनासोबत दाखल एफआयआरची प्रतही जोडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande