नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) नाशिक मध्ये न्यायालयीन कामकाजासाठी अमरावती वरून आणलेल्या कैद्याची बर्दास्त ठेवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केलेल्या तक्रारीनंतर अमरावतीतील उपनिरीक्षकासह तीन पोलीसांना निलंबित करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या फुले नगर परिसरातील राहुल वाडी या ठिकाणी 17 सप्टेंबर रोजी सागर जाधव या पूर्वी गुन्ह्यातून मुक्त झालेल्या युवकावरती गोळीबार करण्यात आला होता या गोळीबाराच्या तपासामध्ये अमरावती येथील जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैदी शेखर निकम आणि या गोळीबारातील आरोपींची बैठक नाशिकमध्ये झाल्याचे समोर आले होते त्यानंतर हा सर्व प्रकार लॉज मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला होता. कैदी शेखर निकम याला पोलीस कस्टडीमध्ये न ठेवता एका लॉज मध्ये ठेवून या ठिकाणी बैठक झाली होती हे देखील समोर आले आहे त्यानंतर नाशिक पोलिसांनी अमरावती पोलिसांकडे तक्रार केली होती.
कैदी शेखर निकम याला आणणाऱ्या पथकातील उपनिरीक्षक मनोहर राठोड यांच्यासह मुकेश यादव व सिद्धेश्वर गुट्टे अशी निलंबित पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे आहेत. सन २०१७ मध्ये पेठ रस्त्यावर सराईत गुन्हेगार संतोष उघडे टोळीने किरण निकम या गुन्हेगाराची निघृण हत्या केली होती. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य असून, निकम खुनातून निर्दोष सुटलेला सागर जाधव याच्यावर पंधरा जणांनी १७ सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडीत गोळी झाडली. या हल्ल्यात सागर जखमी झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी तेरा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक संशयित जगदीश पाटील यांचाही समावेश असून, त्यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नाशिक न्यायालयाने रविवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV