एकूण १९ लाखांचा मुद्देमाल जप्त; १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल गडचिरोली., 30 सप्टेंबर (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्यात प्राण्यांच्या अमानुष छळप्रकरणी मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कसनसूर येथील वेन्हारा चौकात गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आयशर ट्रक व कार मधून गोवंशाची निर्दय वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात २९ गोवंश जातीची जनावरे अपुऱ्या जागेत दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली. प्राण्यांवर होत असलेल्या या अमानुष छळामुळे तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली. फिर्यादीनुसार आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, रोपी, चोखेवाडा, तसेच अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे. सर्व आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलिसांनी २९ गोवंश जातीची जनावरे (किंमत १ लाख ३ हजार ५०० रुपये), आयशर ट्रक (किंमत १० लाख रुपये) आणि व्हेन्यू कार (किंमत ८ लाख रुपये) असा एकूण १९ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपपोलीस निरीक्षक कैलास बेले यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जारावंडी-कसनसूर परिसरात अवैध धंद्यांचा वाढता विळखा एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व कसनसूर परिसर गेल्या काही काळात अवैध धंद्यांचे महेरघर बनत चालल्याचे वास्तव उघड होत आहे. या भागात दारू विक्री, सुगंधित तंबाखूचा पुरवठा, तसेच गोवंश तस्करीसारखे बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम फोफावत असून समाजविघातक प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. यात अनेक तरुण आपले आयुष्य झोकून देत असून शिक्षण, रोजगार याकडे दुर्लक्ष करून ते चुकीच्या मार्गावर वळत आहेत. परिणामी युवकांच्या भविष्यासोबतच संपूर्ण परिसराची प्रतिमाच धोक्यात आली आहे. अवैध धंद्यांची वाढ ही केवळ कायद्याचा भंग नसून सामाजिक समस्या ठरत आहे. दारू आणि तंबाखूच्या सहज उपलब्धतेमुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्यातून कुटुंबात कलह, आर्थिक अडचणी आणि गुन्हेगारी वृत्तीला चालना मिळत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या वाढत्या प्रवृत्तीबाबत तीव्र नाराजी आहे. जर वेळेवर कठोर पावले उचलली गेली नाहीत तर जारावंडी-कसनसूर परिसराला लवकरच अवैध धंद्यांचा हब म्हणून ओळखले जाईल,अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करावी, अशी जनतेची ठाम मागणी होत आहे. वेळेत नियंत्रण न आणल्यास या बेकायदेशीर व्यवसायांमुळे संपूर्ण परिसर असुरक्षित व बदनाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सजग राहून समाजहिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
*मुख्य आरोपी अद्याप फरार;सखोल चौकशीची मागणी कसनसूर येथे झालेल्या कारवाईनंतरही या अवैध धंद्याचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार तो अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून दारू विक्री व गोवंश तस्करीसारखे अवैध व्यवसाय परिसरात उघडपणे चालवत आहे. जारावंडी येथे त्याचा दारूचा अड्डा असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond