नंदुरबार, 30 सप्टेंबर, (हिं.स.) अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले,शेतातील पिके पाण्याखाली गेली, गुरं, ढोर उपाशीपोटी उभी आहेत आणि काही ठिकाणी तर जीवितहानीमुळेघराघरात दुःखाचं सावट दाटलं आहे. या गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारीकार्यालय, नंदुरबार यांनी नागरिकांना एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे डॉ. तुषार धामणे यांनी केले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, तुमची प्रत्येक मदत लहान अथवा मोठी थेट संकटग्रस्तांच्या हातात पोहोचवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
काय आवश्यक आहे?
आज या बांधवांना सर्वाधिक गरज आहे निवाऱ्याची, अन्नाची, स्वच्छतेची आणि औषधांची. तंबू, चादरी, कपडे, पादत्राणे, तांदूळ, डाळी, तेल, दूध पावडर, पाणी, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, मास्क, औषधे, ओआरएस, पशुखाद्य, टॉर्च, ताडपत्री, सोलर लॅम्प अशा गोष्टी तातडीने आवश्यक आहेत.
तुमचा हात पुढे करा…
आज संकटाच्या काळात आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहणं हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. ज्यांच्या संसाराचे घरटे महापुराने वाहून नेले आहे, त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी तुमची मदत अमूल्य ठरणार आहे. देणगी वस्तुरूपात अथवा आर्थिक स्वरूपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जमा करता येईल, असे डॉ. धामणे यांनी कळविले आहे.
संपर्कासाठी…
डॉ. तुषार धामणे, अध्यक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मो.
9823369099)
ऋषिकेश पाटील, समाजसेवा अधिक्षक (मो. 8459850177)
चला, महाराष्ट्र एकदिलाने पुढे येऊ या!
आज एक कुटुंब म्हणून आपल्या भावंडांना आधार द्यायचा आहे. आपण दिलेला प्रत्येक तांदळाचा दाणा, प्रत्येक ब्लॅंकेट, प्रत्येक रुपये त्यांच्यासाठी जीवनदायी ठरणार आहे. “संकटाच्या काळात हात देणं हीच खरी सेवा आहे.” चला, मदतीचा हात पुढे करूया आणि या संकटग्रस्त कुटुंबांना पुन्हा जगण्याची उमेद देऊया, असे
आवाहन डॉ. धामणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर