नंदुरबार, , 30 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात कृषी विकासासाठी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने कृषी विस्तार कार्यक्रम राबवावेत. यामुळे शेतकऱ्यांचे संघटन होऊन बाजारव्यवस्थेत त्यांना हक्काची जागा मिळेल आणि जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असे
प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या वेळी जिल्हास्तरीय कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेच्या योजनेतून स्थापन झालेल्या कंपन्यांचे संचालक व सचिव” उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक “आत्मा” चे सदस्य सचिव दिपक पटेल यांनी केले.
यावेळी डॉ. मित्ताली सेठी यांनी शेतकरी गट आणि कंपन्यांचा खरीप हंगामातील पिक नियोजनात
समावेश करून प्रात्यक्षिके, शेतीशाळा, प्रशिक्षणे आणि अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्याच्या सूचना
दिल्या. जिल्ह्यात तृणधान्याखाली मोठे क्षेत्र असल्याने बाजारपेठ विकसित करण्यासाठी शेतकरी उत्पादक
कंपन्यांना मोठी संधी आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहे, झोमॅटो आदी संस्थांना भगर, राळा, नाचणी यांची
मोठी आवश्यकता असल्याने बाजारजोडणीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासाठी “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मायनर मिलेट्स, हैद्राबाद” या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने प्रयत्न सुरू
असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आणि
परंपरागत कृषी विकास योजना राबविल्या जात आहेत. याबाबतचा आढावा प्रकल्प संचालकांनी सादर
केला. रब्बी हंगामात राळा, अर्धख्योतर, ओवा पिकांचे नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणे व
शेतीशाळांचे आयोजन होणार आहे. अझोला आणि चारा यांची प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. तसेच
पशुसंवर्धन विभाग आणि माविम यांच्या समन्वयाने दुध संकलन व विपणन व्यवस्था विकसित
करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषिनिविष्ठा व्यवसायासाठी पुढाकार घेऊन भागधारकांना योग्य किमतीत
आणि वेळेत पुरवठा करण्याची गरज आहे. यासाठी महाबीज, एनएससी व राज्य कृषी उत्पादक कंपन्यांची
डीलरशिप देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रयत्न करतील, असे निर्देश मा. अध्यक्षांनी दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील मृदा चाचणीसाठी सध्या २७ हजार माती नमुने घेतले जात असल्याची
माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी दिली. तसेच नाबार्डमार्फत
सोयाबीनआधारित खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी महिला गटांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रकल्प
राबविण्यात येत असल्याचे जिल्हा उपप्रबंधक, नाबार्ड यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी कंपन्यांच्या संचालकांनी आपापल्या अडचणी मांडल्या तसेच मूल्यवर्धनासाठी राबविल्या
जाणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि मा. अध्यक्षांचे आभार मानले. “१० हजार शेतकरी उत्पादक
कंपनी” स्थापनेच्या योजनेत स्थापन झालेल्या कंपन्यांनी व्यवसाय प्रगतीचे सादरीकरणही केले.
सभेच्या शेवटी प्रकल्प उपसंचालक श्री. मंगेश पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर