सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। सीना कोळेगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील परांडा, भूम (जि. धाराशिव), आष्टी (जि. बीड), अहिल्यानगर, कर्जत, जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. सोलापूर जिल्ह्यातही बार्शी, माढा, करमाळ्यासह सर्वच तालुक्यांत पाऊस थांबल्याने सीना कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. येवा घटल्याने, पाऊस थांबल्याने सीना नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचाही विसर्ग घटला आहे.
सीनेत सोडल्या जाणाऱ्या पाण्यात घट झाली असली, तरीही भीमा नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यात आजपासून वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत रविवारी झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून १ लाख २५ हजार ५३२ क्युसेकने (नृसिंहपूर संगम) पाणी सोडले जात होते. भीमा नदीत जवळपास सव्वालाख क्युसेकने पाणी सोडले जाऊ लागल्याने पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड