मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। सातारा जिल्ह्यातील फलटण येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
फलटण येथे सध्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर अशी दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी फलटण येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. यानुसार दिवाणी न्यायालय,वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास आज मंजुरी देण्यात आली.
या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत व ४ पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर खर्चासह १ कोटी ८४ लाख २१ हजार ३१२ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर