सोलापूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेकांचे संसार उघड्यावर पडले. घरातील साहित्य पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शहरातील २ हजार ६१९ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तब्बल १५ दिवसानंतर या बाधित कुटुंबांना शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मदतीची रक्कम हातात कधी येणार? याची प्रतीक्षा कायम आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर शहरातील शेळगी भाग, विडी, घरकुल, वसंत विहार, जुना पूना नाका आदी परिसरातील तब्बल २५ नगरामध्ये पाणी शिरले. अनेक घरांमधील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सण-उत्सवाच्या तोंडावर घरात भरून ठेवले अन्नधान्य भिजून गेले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नगरातील कुटुंबीयांचे पंचनामे झाले. या पंचनाम्याला साधारणः १० दिवस उलटून गेले आहेत. या दरम्यान मुसळधार पावसाने पुन्हा यातील काही नगरे पाण्याखाली गेली. आता शासनाकडून दहा हजारांची मदत देण्यात येणार आहे. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी एकाही कुटुंबाला मदत मिळाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड