परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेचा परभणीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी आणि पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्यांना होणारा त्रास थांबवावा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ऋजू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लांडगे, प्रा. रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम भाई, दत्ता थवरे, शेख अदनान व शेख झहीर भाई उपस्थित होते.
प्रतिनिधींनी सांगितले की, वांगचुक यांनी गेल्या पाच वर्षांपासून शांततामार्गाने लडाखच्या जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या. आइस स्टुपा प्रकल्प, भारतीय सैनिकांसाठी सौर-ऊर्जेवर चालणारे तंबू आणि शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम यामधून त्यांचे योगदान देशासाठी अतुलनीय आहे.
“अशा व्यक्तीवर खोटे आरोप लावून बेकायदेशीर अटक करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय द्यावा,” अशी ठाम भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis