आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा जिंतूरमध्ये भव्य मोर्चा
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अनुसूचित जमातींच्या आरक्षण हक्कांवर कुठल्याही प्रकारे गदा येऊ नये, ही ठाम भूमिका मांडण्यासाठी आज जिंतूर शहरात सकल आदिवासी समाजाने भव्य मोर्चाचे आयोजन केले. सकाळी दहा वाजता निघालेल्या या मोर्चामध्ये समाजबांधवांचा उत्स्फू
आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा जिंतूरमध्ये भव्य मोर्चा


परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। अनुसूचित जमातींच्या आरक्षण हक्कांवर कुठल्याही प्रकारे गदा येऊ नये, ही ठाम भूमिका मांडण्यासाठी आज जिंतूर शहरात सकल आदिवासी समाजाने भव्य मोर्चाचे आयोजन केले. सकाळी दहा वाजता निघालेल्या या मोर्चामध्ये समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. “आरक्षण आमचा हक्क आहे”, “आरक्षणावर गदा येऊ देणार नाही” अशा घोषणांनी संपूर्ण शहराचा कणा हादरवला.

मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या विविध संघटना, स्थानिक व जिल्हास्तरीय नेते, तरुणाई आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या ऐक्यामुळे समाजाची राजकीय व सामाजिक ताकद अधोरेखित झाली. विशेष म्हणजे हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हता, तर समाजाच्या आत्मभानाचे व भविष्याच्या दिशा ठरविणाऱ्या निर्धाराचे दर्शन होता.

आदिवासी समाजाचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवावे, अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावेत, शिक्षण, रोजगार व विकास योजनांमध्ये आरक्षणाची सक्तीने अंमलबजावणी करावी. या मागण्या केवळ राजकीय घोषवाक्ये नसून, समाजाच्या अस्तित्वाशी निगडित जीवनरेखा असल्याचे नेत्यांनी अधोरेखित केले.

सकल आदिवासी समाजाने एकत्र येऊन काढलेल्या या मोर्चामुळे समाजातील ऐक्याची जाणीव ठळकपणे दिसून आली. विविध संघटना एकत्र आल्याने समाजातील विखुरलेले आवाज एकसंध शक्तीत रुपांतरित झाले. हीच ताकद भविष्यातील आंदोलनांचे व राजकीय समीकरणांचे केंद्रबिंदू ठरू शकते.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला, हे आदिवासी समाजाच्या संघटित शक्तीचे आणि जागरूकतेचे उदाहरण ठरले. तहसील कार्यालयावर मोर्च्याची सांगता होऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande