रायगड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। आपल्या शेतकऱ्यांसाठी असणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज ६५ वर्षांची झाली आहे. सहकाराच्या बळावर सुरू झालेली ही बँक आज ग्रामीण भागाला आर्थिक आधार देणारी भक्कम संस्था ठरली आहे.
३० सप्टेंबर १९६० रोजी नोंदणी आणि २ ऑक्टोबर १९६१ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर कार्यारंभ झालेली ही बँक सुरुवातीला कुलाबा जिल्हा बँक या नावाने ओळखली जात होती. १९८१ पासून बँक रायगड जिल्ह्याच्या नावाने कार्यरत झाली.
शेतकऱ्यांचा आर्थिक मित्र बनणे, हे बँकेचे ध्येय ठरले. केवळ व्यवहारापुरती बँक न राहता, ग्राहकांना आधुनिक सोयीसुविधा देत विश्वास आणि पारदर्शकतेने काम करणारी बँक अशी या संस्थेची ओळख निर्माण झाली.
२००० साली संगणकीकरण, २००८ मध्ये सीबीएस, त्यानंतर एटीएम, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड पेमेंट अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे रायगडच्या गावोगावी आधुनिक बँकिंग पोहोचले.
या प्रवासात नेतृत्वाची मोठी भूमिका राहिली. सुरुवातीच्या अध्यक्षांपासून आजवर सर्वांनी योगदान दिले. गेली २८ वर्षे भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेने शून्य एनपीए राखून सलग १५ वर्षे राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. त्यामुळे रायगड बँक आदर्श जिल्हा बँक ठरली.
सामाजिक कामातही बँक नेहमी पुढे असते. महिलांच्या बचतगटांना कर्ज, कोविड काळातील मदत, शिक्षण-खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांना हातभार असे उपक्रम सातत्याने राबवले गेले.
आज बँकेचा व्यवसाय ६,७०० कोटींवर पोहोचला असून पुढील दोन वर्षांत १०,००० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. सहकार, आधुनिकता आणि समाजाशी नाते जपणारी ही बँक आज खरंच प्रत्येक रायगडकराचा अभिमान ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके