सहकारी संस्थांना वार्षिक सभा घेण्यासाठी मुदतवाढ; 31 ऑक्‍टोबरपर्यंत वेळ
पुणे, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यात अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सभा 30 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यास अडचणी आलेल्या आहेत. त्याचा विचार करुन या सभा घेण्यास एक महिन्यांची म्हणजे दिनांक 31 ऑक्
सहकारी संस्थांना वार्षिक सभा घेण्यासाठी मुदतवाढ; 31 ऑक्‍टोबरपर्यंत वेळ


पुणे, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यात अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सभा 30 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यास अडचणी आलेल्या आहेत. त्याचा विचार करुन या सभा घेण्यास एक महिन्यांची म्हणजे दिनांक 31 ऑक्‍टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचे महत्वपूर्ण आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सोमवारी जारी केले आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातील सहकारी संस्थांना दिलासा मिळालेला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलमांन्वये राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज चालविण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्था वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत आपल्या सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलवील, अशी तरतूद आहे. त्यानुसार सर्व सहकारी संस्थांना त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण बैठका या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आयोजित करणे आवश्यक आहे.राज्यात कायद्यान्वये सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांचा धडाका सप्टेंबर महिन्यात सुरु होता. मात्र, अतिवृष्टीमुळे सभा घेण्याच्या जागांवरही पुराचे पाणी आहे. अशा स्थितीत सभा कशा घेणार? शिवाय झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी सभासदांची उपस्थितीही अवघड आहे. त्यामुळे ही स्थिती पूर्वपदावर येण्यास थोडा अवधी लागणार आहे. त्यादृष्टिने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही वार्षिक सभा घेण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचना दिल्या होत्या. सहकारी संस्थांकडूनही तशी मागणी येत होती. या सर्व बाबींचा विचार करुन सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा घेण्यास एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त तावरे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande