सोलापूर - पुराने बाधित झालेल्या जिल्ह्याच्या 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत
सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने दि.15 ते दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण 95 गावांचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झालेला होता. परंतु गावातील पुराचे पाणी कमी झाल्यानं
सोलापूर - पुराने बाधित झालेल्या जिल्ह्याच्या 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत


सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने दि.15 ते दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण 95 गावांचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झालेला होता. परंतु गावातील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ 74 गावातील वीजपुरवठा पूर्ववत केलेला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हयातील महावितरणचे 33/11 केव्ही क्षमतेचे एकूण 19 उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पूराचे पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील आवाटी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी व भांबेवाडी, माढा तालुक्यातील कुंभेज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, हत्तरसंगकुडल व वडकबाळ, अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, गुडडेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती. त्यामुळे 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 92 वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. सदर 92 वाहिन्या बंद असल्याने एकूण 28 हजार 59 घरगुती ग्राहक व 39 हजार 41 शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झालेला होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे.

तसेच सीना नदीकाठ भागात असलेले महावितरणचे शेतीपंपास वीज पुरवठा करणारे एकूण 5 हजार 604 वितरण रोहित्र फार मोठया प्रमाणात पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणचे अंदाजे नुकसान 25 ते 30 कोटी पर्यंत झाल्याचे आढळून आले आहे.

महावितरणचे सर्व अभियंते व क्षेत्रीय कर्मचारी यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत केलेला आहे. उर्वरित 21 गावे यांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या व रोहित्र दि. 24 सप्टेंबर.2025 पर्यंत पुर्णत: पाण्यात असल्याने त्यांचा वीज पुरवठा अद्यापही खंडीत आहे. ज्या भागातील वीज पुरवठा खंडीत होता त्याभागात इतर उपकेंद्रामधून पर्यायी 11 केव्ही वाहिन्यांव्दारे वीज पुरवठा करून सुरळीत करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.

सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर उपविभागात 33 केव्ही वाहिनी चे 7 पोल पुराच्या पाण्यात पुर्णत: पडलेले असताना देखील पर्यायी 33 केव्ही वाहिनीव्दारे 7 गावांचा वीज पुरवठा मोठया प्रमाणत पाऊस असताना देखील 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात यश आले आहे, असे श्री.माने यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande