
रत्नागिरी, 1 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे ३ जानेवारी रोजी भारतीय संविधान अमृतमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऍड. पाटणे म्हणाले की, जगातील सर्वांत मोठे असलेले भारतीय संविधान ही खऱ्या अर्थाने राष्ट्राची कोनशिला असून तो सामाजिक क्रांतीचा एक जिवंत दस्तऐवज आहे. जगातील इतर देशांच्या संविधानांचे सरासरी आयुष्य केवळ वीस वर्षे असताना, भारतीय संविधानाने ७५ वर्षे पूर्ण करूनही आज १४५ कोटी भारतीयांना एकत्र बांधून ठेवले आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेला ऐतिहासिक सोहळा शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता हॉटेल विवेक येथे होणार आहे, असे पाटणे म्हणाले.
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, महाराष्ट्राचे महाधिवक्ता (ॲडव्होकेट जनरल) मिलिंद साठे आणि जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संविधानाच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकताना ॲड. पाटणे म्हणाले की, संविधानाचा पहिला मसुदा १८९५ साली तयार झाला होता, ज्याचे अभ्यासक लोकमान्य टिळक होते. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दूरदृष्टीने भारतीय लोकशाहीला बळकट केले. १९१९ साली केवळ ३ टक्के लोकांना मतदानाचा अधिकार असताना डॉ. आंबेडकरांनी साऊथबरो कमिटीसमोर ऐतिहासिक साक्ष देऊन जास्तीत जास्त लोकांना आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याची आग्रही मागणी केली. ज्या काळात अमेरिकेतही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्याकाळी डॉ. आंबेडकरांनी मांडलेले हे विचार काळाच्या पुढचे होते. भारतीय लोक आणि राजकीय पक्ष कसे वागतात, यावरच संविधानाचे भवितव्य अवलंबून असते, या बाबासाहेबांच्या शब्दांची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
पत्रकार परिषदेला ॲड. निनाद शिंदे, ॲड. शाल्मली आंबुलकर, सचिव ॲड. रत्नदीप चाचले, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. राहुल चाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे आयोजित या अमृत महोत्सवी सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी