
नाशिक, 01 जानेवारी (हिं.स.)। मुंबई नाका ते द्वारका दरम्यान उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार द्वारकाच्या दिशेने जात असताना नायलॉन मांज्याने दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती वेढा घातला. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार प्रकाश भिमाजी सोमाशे (४८) यांचा गळा चिरला गेला.
दरम्यान, प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणली असली तरी नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास प्रकाश सोमाशे हे दुचाकीवरून आपल्या पत्नीसह उड्डाणपुलावरून द्वारकाच्या दिशेने जात असताना नायलॉन मांज्याने त्यांचा गळ्याला वेढा घातला. त्यामुळे त्यांचा गळा चिरून ते गंभीर जखमी झाले. जखम मोठी असल्याने प्रचंड रक्तस्त्राव होत असताना घटनास्थळी पाठीमागूनचारचाकी वाहनातून आलेल्या गणेश शहाणे यांनी प्रसंगावधान राखत प्रकाश सोमाशे यांना तत्काळ चार चाकी वाहन थांबवत मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
सध्या सोमाशे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना गळ्यावर बारा ते पंधरा सेंटीमीटरची खोल जखम झाल्याची रुग्णालयातर्फे माहिती देण्यात आली असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सोमासे यांच्यावर पुढील उपचार करत आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजाविरोधात पोलीस कारवाई सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र उड्डाणपूल रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर उठताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांतून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV