20 वर्षांपूर्वी ‘गांजा तपासणी’च्या बहाण्याने खिशातील रक्कम चोरणारा आरोपी अखेर गजाआड
लातूर, 01 जानेवारी, (हिं.स.)। लातूर पोलीस दलाच्या विशेष पथकाने तब्बल 20 वर्षांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून न्यायालयीन प्रक्रियेसमोर उभे केले असून, ही कारवाई लातूर पोलिसांच्या सातत्यपूर्ण व चिकाटीच्या तपासाचे उत्तम उ
20 वर्षांपूर्वी ‘गांजा तपासणी’च्या बहाण्याने खिशातील रक्कम चोरणारा आरोपी अखेर गजाआड. लातूर पोलिसांच्या विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी


लातूर, 01 जानेवारी, (हिं.स.)।

लातूर पोलीस दलाच्या विशेष पथकाने तब्बल 20 वर्षांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून न्यायालयीन प्रक्रियेसमोर उभे केले असून, ही कारवाई लातूर पोलिसांच्या सातत्यपूर्ण व चिकाटीच्या तपासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

सदर प्रकरण आरसीसी नं. 613/2006, डारमंड फाईल नं. 120/2018 तसेच पोलीस स्टेशन गांधी चौक गु.र.नं. 256/2005, कलम 379, 34 भा.दं.वि. अन्वये दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे राजेंद्र ऊर्फ राजू निवृत्ती बनसोडे (वय 54 वर्षे), रा. प्रकाशनगर, लातूर, सध्या रा. विकासनगर, लातूर हा गेल्या २० वर्षांपासून फरार होता.

फिर्यादी सोमनाथ शामराव मुळे, रा. तेर, ता. व जि. उस्मानाबाद हे दि. 25/02/2005 रोजी तेरणा इंजिनिअरिंग महाविद्यालयात बी.ई. (आयटी) फायनल इयरचे शिक्षण घेत असताना, मोटार खरेदीसाठी लागणाऱ्या सबमर्सिबल मोटारीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लातूर येथे आले होते. त्यांनी सोबत 10,000/- रुपये आणले होते. खरेदी केल्यानंतर उरलेली रक्कम व दुकानांच्या पावत्या त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या होत्या.

रात्री अंदाजे 08.00 वाजण्याच्या सुमारास, मध्यवर्ती बसस्थानक, लातूर येथे एस.टी.डी. कॉईन बॉक्सवरून फोन करून बाजूला जात असताना, दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व “तुझ्या खिशात गांजा आहे, तपासणी करू दे” असे सांगून, फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील 450/- रुपये व खरेदीच्या पावत्या जबरदस्तीने काढून घेतल्या.

फिर्यादीने आरडाओरड करताच बसस्थानकावरील पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून एका आरोपीस पकडले व त्याच्याकडून 450/- रुपये व पावत्या जप्त केल्या. त्यावरून पोलीस स्टेशन गांधी चौक येथे गु.र.नं. 256/2005, कलम 379, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सतत आपले वास्तव्य बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी सध्या विकासनगर, लातूर येथे वास्तव्य करत आहे. ही माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर विशेष पथकाने नियोजनपूर्वक कारवाई करत, आरोपी राजेंद्र ऊर्फ राजू निवृत्ती बनसोडे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यास पोलीस स्टेशन गांधी चौक येथे आवश्यक रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांच्या विशेष पथकातील सपोनि शिवशंकर मनाळे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,

पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे, योगेश गायकवाड, श्रीकांत कुंभार यांनी सदर उल्लेखनीय कामगिरी बजावली.

20 वर्षांनंतरही गुन्हेगाराला शोधून काढत कायद्याच्या कचाट्यात आणणे, हे लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे, तांत्रिक तपासाचे व चिकाटीचे जिवंत उदाहरण आहे. कायद्यापासून कोणीही कायमचा सुटू शकत नाही, हा ठाम संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा समाजास देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande