मतदान हे 'राष्ट्रीय कर्तव्य' - मनपा आयुक्त
लातूर, 01 जानेवारी (हिं.स.)। मतदान हे ''राष्ट्रीय कर्तव्य''; लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - मनपा आयुक्त श्रीमती मानसी लातूर : मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टी म्हणून मौजमजा करण्याचा दिवस नसून, तो एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपले कर
मतदान हे 'राष्ट्रीय कर्तव्य'; लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - मनपा आयुक्त श्रीमती मानसी


लातूर, 01 जानेवारी (हिं.स.)।

मतदान हे 'राष्ट्रीय कर्तव्य'; लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - मनपा आयुक्त श्रीमती मानसी

लातूर : मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टी म्हणून मौजमजा करण्याचा दिवस नसून, तो एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचा दिवस आहे.लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी तरुण वर्गामध्ये मतदान करण्याची 'क्रेझ' निर्माण झाली पाहिजे, असे परखड प्रतिपादन लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रीमती मानसी यांनी केले.

लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर, दयानंद कला महाविद्यालय येथे 'स्वीप' (SVEEP) अंतर्गत आयोजित मतदान जनजागृती अभियानात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना श्रीमती मानसी यांनी मतदारांमधील उदासीनता दूर करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, केवळ सुट्टीचा आनंद घेण्यापेक्षा लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान करण्यासोबतच आपल्या घरातील आणि परिसरातील सर्व पात्र मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून एक सजग नागरिक म्हणून आपली भूमिका बजावावी. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सांगितले की, तरुणांनी मतदान प्रक्रियेत केवळ मतदार म्हणून नव्हे,तर सक्रिय घटक म्हणून सहभागी होऊन राष्ट्रीय विकासामध्ये आपला मोलाचा हातभार लावणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मतदान जनजागृती करण्यासाठी उभारलेला सेल्फी पॉईंट व कलेच्या माध्यमातून झालेली जनजागृती. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. संदिपान जगदाळे व महाविद्यालयातील संगीत व नाट्य विभागातील प्राध्यापकांच्या चमूने पोवाड्याचे सादरीकरण केले, तर मनपा शाळा क्रमांक सहाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार भारूडा सादर करून मतदानाचे महत्त्व पटवून दिले.या सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या अभियानास मनपा अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव,उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मनपा शिक्षणाधिकारी श्वेता नागणे, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित आणि प्रा. डॉ. शिवकुमार राऊतराव, सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. दशरथ ननवरे यांनी केले, तर आभार मधुकर ढमाले यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande