
अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)।
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान देत विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत संभ्रम निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधू वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनता विकासाला मत देईल आणि युतीला मतदान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत पराभव दिसू लागला की उद्धव ठाकरे अशा प्रकारची वक्तव्ये करतात, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. “मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकत नाही. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.भावनिक मुद्दे उभे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी मुंबईकर भाजप आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील, असा दावा त्यांनी केला.दरम्यान, राज्यभरात गाजलेल्या अकोट नगरपरिषदेतील भाजप–एमआयएम युतीबाबत बोलताना बावनकुळे यांनी हा गट चुकीने तयार झाल्याची कबुली दिली. या प्रकरणी आमदार प्रकाश भारताकडे यांच्यावर कारवाईचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात माध्यमांचा कोणताही दोष नसल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे