भाजपासह अन्य विरोधी पक्ष एकाच माळेचे मनी : असदुद्दीन ओवेसी
परभणी, 11 जानेवारी (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे या सत्तारुढ गटासह त्यांचे विरोधक काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे सारे एकाच माळेचे मनी आहेत, त्
भाजपासह अन्य विरोधी पक्ष एकाच माळेचे मनी : असदुद्दीन ओवेसी


परभणी, 11 जानेवारी (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे या सत्तारुढ गटासह त्यांचे विरोधक काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे सारे एकाच माळेचे मनी आहेत, त्यामुळे त्यांचे मुखवटे ओळखून सर्वसामान्य नागरीकांनी तात्काळ सावध व्हावे व या निवडणूकीच्या माध्यमातून एआयएमआयएमच्या मागे सर्व ताकद उभी करावी, असे आवाहन एआयएमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी परभणीतील जाहीर सभेतून केले.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक रिंगणातील एआयएमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज रविवार 11 जानेवारी रोजी खासदार ओवेसी यांची येथील इदगाह मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते.

परभणी महानगरपालिका निवडणूक असो, अन्यत्रसुध्दा भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे सत्तारुढ महायुतीतील मित्रपक्ष हेतुतः एकमेकांविरोधात उभे आहेत. तर महाविकास आघाडीतीलही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे मित्रपक्ष सुध्दा भाजपा विरोधात एकसंघपणे लढण्याऐवजी स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. एकूणच सत्तारुढ असो किंवा विरोधी पक्षांच्या स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या या भूमिका या अक्षरशः संशयास्पद आहेत, असे ओवेसी यांनी नमूद केले. परभणीसारख्या महापालिकेत मुस्लिम समाजाचे प्राबल्य असणार्‍या प्रभागातच विरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. अन्य प्रभागात या पध्दतीने सत्तारुढ पक्षासमोर सक्षम असे आव्हान उभे केलेले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे दलित आणि मुस्लिम या समाजाला संभ्रमावस्थेत टाकण्यासह त्यांचे अमूल्य मत हे खेचून ते वाया कसे घालता येईल, हेच त्याचे प्रमुख कारण आहे.

विरोधी पक्षातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांना आताच मुस्लिम समाजाविषयी कळवळा आला कसा? असा प्रश्‍न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधीमंडळात बाबरी मस्जिद पाडणार्‍याबद्दल आपणास अभिमान आहे, असे वक्तव्य केले होते. तर त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात संघर्ष उभा केला, असे आवाहन केले होते. ते दोघे आता एकत्र येऊन पुन्हा विष पसरविण्याचे काम पध्दतशीरपणे करीत आहेत, असा आरोप खासदार ओवेसी यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही सत्तेकरीता भाजपबरोबर तडजोडी केल्या, वक्फ बोर्डा संदर्भातील काळा कायदा मंजूर व्हावा, यासाठी संसदेत याच पवार गटाचे खासदार भक्कमपणे समर्थनार्थ उतरले होते. तर काँग्रेसनेसुध्दा सातत्याने ऐनकेन प्रकारे काहीसे मुस्लिम विरोधी कायदे अस्तित्वा आणले. ते कायदे आता अनेकदा अडसर ठरत आहेत, असा आरोप खासदार ओवेसी यांनी केला. सत्तारुढ असो, विरोधी पक्षांचे हे मुखवटे सर्वसामान्य नागरीकांनी ओळखावेत व महापालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या 18 एमआयएमच्या उमेदवारांना भक्कमपणे पाठींबा द्यावा, असे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीचे नेते रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी या तीघांवर खासदार ओवेसी यांनी कडाडून टीका केली. हे तीघे सातत्याने डबलरोलची भूमिका बजावत आले आहेत. यातील वरपुडकर-बोर्डीकर व दुर्राणी हे पडद्याआड सोयीच्या भूमिका घेत आले आहेत. या तीघांना सर्वसामान्य जनतेशी काहीही देणे घेणे नाही, त्यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावे, हेच त्यांचे मुख्य सूत्र आहे. जमीनीचे वादग्रस्त व्यवहार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. परभणी महानगरपालिका निवडणूकीत आठ शक्ती सर्व ताकतिनिशी उभ्या आहेत. त्या शक्तींचे शिकार होवू नका, आपले मत वाया घालवू नका, वारंवार पलटी मारणार्‍यांना, दगाबाजी करणार्‍यांना झटका द्या, असे आवाहन खासदार ओवेसी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande