
बीड, 11 जानेवारी (हिं.स.)।
मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.० योजनेअंतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील कृषी वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय झाला आहे. या तीनही तालुक्यांतील ११ वीज उपकेंद्रांसाठी १० आणि ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत.
आष्टी शहरासाठी १० एम.व्ही.ए. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर दाखल झाला. लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. यामुळे स्थानिक वीज वितरण यंत्रणा बळकट होणार आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. वारंवार होणारे ट्रिपिंग, कमी दाबाची वीज आणि ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार कमी होणार आहेत. परिणामी, शेती सिंचनाला गती मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सावरगाव, जळगाव (कडा कारख कारखाना), डोईठाण, कुसळंब, लांबरवाडी, कोतन, दासखेड, घाटशीळ, पारगाव आणि भायाळ येथील उपकेंद्रांवर नवे ट्रान्सफॉर्मर बसवले जात आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ट्रान्सफॉर्मरची पूजा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते झाली. यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ घोडे, महावितरणचे उपअभियंता शिवाजी देशमुख, उपस्थित होते.
या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे कृषी पंपांना स्थिर वीज मिळणार आहे. लोडशेडिंग कमी होणार आहे. कमी व्होल्टेजची समस्या दूर होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत दर्जेदार वीज मिळणार आहे. परिणामी, उत्पादन वाढून उत्पन्नातही वाढ होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis