
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘ई-केवायसी’ करणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील ३० लाख तर सोलापूर जिल्ह्यातील सव्वालाख महिलांनी मुदतीत ई-केवायसी केली नाही. आता मुदत संपल्याने या लाडक्या बहिणींना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे.
राज्यातील दोन कोटी ५७ लाख महिलांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावरील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न एवढे कमी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर प्रत्येक निकषाच्या आधारावर लाभार्थींची पडताळणी झाली. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखांवर महिला अपात्र ठरल्या. आता उत्पन्नाच्या निकषांची पडताळणी केली जात असून, त्यासाठी सर्वांना ‘ई-केवायसी’चे बंधन घातले होते. त्यासाठी तीन महिन्यांची मुदतही दिली. तरीपण, लाखो महिला ‘ई-केवायसी’ करायच्या राहिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आणखी मुदतवाढ मिळेल, अशी त्यांना आशा होती. पण, ३१ डिसेंबरनंतर मुदतवाढ मिळाली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड