
नाशिक, 11 जानेवारी (हिं.स.)।
:- देवळाली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर मादी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आली असून, तिला पुढील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.
आज सकाळी ७ वाजता देवळाली रेल्वे स्टेशनजवळील भगूर येथील मुंबईकडे जाणाऱ्या (अप लाईन) रेल्वे ट्रॅकवर पोल क्रमांक १७९/३२ येथे वन्यप्राणी बिबट्या जखमी अवस्थेत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. तत्काळ नाशिक वनपरिक्षेत्राचे वन्यप्राणी बचाव पथक जागेवर पोहोचले. त्यानंतर जखमी बिबट्यास बाजूला करून रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वेच्या धडकेने बिबट्याच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. तसेच
एक पाय पूर्ण तुटून बाजूला पडलेला आढळला. रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे वन्यजीव पशुवैद्यक व त्यांची टीम यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाला. सदर बिबट मादी असून तिचे वय अंदाजे ७ ते ८ महिने असल्याचे वन्यजीव पशुवैद्यक यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV