
रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : पुण्यातील स्काय रोबोटिक्सतर्फे रोबोकॉन २ या कोकण विभागीय आंतर शालेय रोबोटिक स्पर्धेचे आयोजन येत्या १७ जानेवारी रोजी रत्नागिरीत करण्यात आले आहे.ही स्पर्धा रत्नागिरीच्या सर्वंकष विद्यामंदिराच्या सहकार्याने विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
गतवर्षी १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा ‘लाईव्ह बिल्ड अॅण्ड एक्झिबिट’ या स्वरूपात असेल. सहभागी विद्यार्थी स्पर्धेच्या ठिकाणी रोबो, मॉडेल्स तयार करणार असून त्यानंतर त्याचे सादरीकरण व प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी रोबोट गॅलरी आणि विविध आव्हानात्मक उपक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची कल्पकता, तांत्रिक समस्यानिवारण क्षमतेची चाचणी घेणे हा या स्पर्धेचा मुख्य भाग असल्याचे आयोजक अभिजित सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना रोबोकॉन-२ चे पदक, सहभाग प्रमाणपत्र तर शाळेला सहभाग चषक देण्यात येईल. सर्वोत्तम कामगिरी करणार्या विद्यार्थी व शाळांना विजेता व उपविजेता चषक देऊन गौरव होईल. प्रत्येक शाळेने जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवाव्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी