
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)।
वासुदेवांच्या आवाजात उमेदवारांची प्रचारगीते आपल्या कानावर पडू लागली आहेत. प्रचाराच्या नव्या फंड्यामध्ये वासुदेवांसह हलगी, संबळ, टाळ, तुणतुणे, खंजिरी आदी पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या लोककलावंतांचाही सहभाग दिसून येत आहे. लोककलेच्या माध्यमातून प्रचार करण्याची अनोखी शक्कल उमेदवारांनी लढविली असून, लोककलावंत प्रभागांमध्ये जाऊन लोककलांचे सादरीकरण करून उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.
लोककलावंतांचे विविध गट पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊन कलेचे सादरीकरण करत आहेत. प्रचारफेऱ्यांमध्येही पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमतोय. महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावर भर दिला जात आहेच. पण प्रत्यक्ष प्रचारावरही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु