
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी यदाकदा संख्याबळ कमी पडले तरी भाजपास कदापी सोबत घेणार नाही. आमच्याकडे शिवसेना (शिंदे) पक्ष हा सक्षम पर्याय आहे. याशिवाय आम्ही अन्य काही राजकीय पक्षांचा विचार करू पण भाजपाचा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
आ. चिखलीकर म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपा, एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर मराठवाडा जनहित पार्टी ही भाजपाचीच बी टीम आहे. नांदेडमध्ये भाजपा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. आरएसएसच्या मुशीत वाढलेले, निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपात अंतर वाढू लागले आहे. मी कोणावर टीका करीत नाही पण, वास्तव समोर ठेवतो, असे ते म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवदी काँग्रेसने एकुण ५७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आम्हाला ज्या जागांविषयी शंका होती, अशा जागांवरून एबी फॉर्मनंतरही आम्ही माघार घेतली आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) पक्षासोबत युती झाली आहे. महापौर पदासाठी संख्याबळ कमी पडलेच तर आम्ही नांदेड उत्तरमधील शिवसेनेला सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. परंतू भाजपाची साथ कदापी घेणार नाही. पिंपरी-चिंचवड, बारामती व नवी मुंबईच्या धर्तीवर नांदेड शहराचा विकास करण्याचा आमचा मानस आहे, असेही आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
शहरातील प्रत्येक भागात दवाखान्याची निर्मिती, मनपाच्या दर्जेदार शाळा, मनपाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा, शहरात वृक्ष लागवड, कलामंदिर, भाजी मार्केटची पुनर्रस्थापना, नागरिकांना मुबलक प्रमाणात रोज पाणीपुरवठा, स्वच्छ नांदेड यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे आ. चिखलीकर यावेळी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis